भोकरदन, जालना १७ जुलै २०२४ : सन २०२१ साली मंजुर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे आणि रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता रुग्णवाहिकेंच्या संख्येत वाढ करावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख विकास जाधव, प्रहार संघटनेचे ता.अध्यक्ष नारायण मिसाळ हे भोकरदन उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसले होते.
या उपोषणास विविध सामाजिक संघटना आणि विविध पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दिला. उपोषणास मिळणारा पाठिंबा बघुन उपविभागीय कार्यालयाने बांधकाम विभागास तातडीने या उपोषणाची माहिती दिली. दरम्यान बांधकाम विभागाचे अभियंता एन.एस.घुले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संबंधीत उपजिल्हारुग्णालयाचे बांधकाम सुरु होईल असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणकर्ते विकास जाधव व नारायण मिसाळ यांनी १५ ऑगस्ट पर्यंत उपोषण स्थगीत केले.
यावेळी छावा संघटना, शेतकरी संघटना, बळीराजा फाउंडेशन, एमआयएम पक्ष, आम आदमी पक्षासह विविध सामाजिक संघटनेसोबतच विविध राजकीय आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
न्यूज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे