कामगारांनी गावी जाण्यासाठी बस, रेल्वेचा वापर करावा: मेधा पाटकर

पुणे, दि.१९ मे २०२०: पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या कामगारांनी, स्थलांतरीत कामगारांनी गावी जाताना पायी न जाता उपलब्ध असलेल्या बस – रेल्वेचा वापर करून आपल्या मूळगावी जावे, असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

पिंपरी चिंचवडसह पुणे शहरातील सर्व असंघटित कामगारांशी त्यांनी संवाद साधला. कामगारांना मिळणारे वेतन, ठेकेदार करत असलेली फसवणूक अशा अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. याशिवाय रेशनिंग व्यवस्था यावरही त्यांनी सविस्तर चर्चा केली.

यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इब्राहिम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, उमेश डोर्ले, नाना कसबे, इरफान चौधरी, अर्चना कांबळे, सुमन अहिरे, तुकाराम माने आदीसह विविध ठिकाणचे कामगार उपस्थित होते.

मेधा पाटकर म्हणाल्या की, रेशन व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. प्रत्येकाला रेशन मिळाले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार यासाठी अनुकूल असून सुद्धा प्रत्यक्षात दुकानदाराकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. आणि कामगारांच्या हक्काचे रेशन मिळत नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्याचबरोबर कामगारांनी रेशनिंग व्यवस्थेत बदल असणार्‍या तक्रारी मांडल्या पाहिजेत.

शहर आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये विविध ठिकाणी पायी चालत जाताना कामगारांचे लोंढे दिसत आहेत. त्यांना कार्यकर्त्यांनी व प्रशासनाच्या प्रतिनिधीने संबंधित पोलिसाना संपर्क करुन त्यांना इच्छितस्थळी पाठवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.

या पायी चालण्याचा कारणांमुळे विविध ठिकाणी अपघात होऊन बहुतांशी वेळा अनेक जखमा होऊन अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहेत. अपघातातही अनेक कामगारांचे मृत्यू झालेले आहेत हे टाळले गेले पाहिजे, कामगारांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्याची शासनाने व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे पाटकर यांनी यावेळी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा