फलटण, १ फेब्रुवारी २०२३ : निरा-देवघर कालव्याच्या पाण्यासंदर्भात मागील माहायुती सरकारने घेतलेल्या निर्णय आज भाजप-शिवसेना सरकारने रद्द करुत पुन्हा ३९७६ कोटींची सुधारित मान्यता देत येणाऱ्या काळात कॅनॉलचे काम पूर्ण करून फलटण, माळशिरस तालुक्यांतील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर केला आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मागील महायुती सरकारने वळवून बारामतीला नेले होते. संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय केला होता. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन व इतर विषयांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज सकाळी बैठक झाली. या बैठकीस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील आणि जलसंपदा, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निर्देश दिले. हा अन्याय दूर करण्यासाठी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सुरू केलेला संघर्ष पुढे त्यांच्या पश्चात त्याचे पुत्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढे नेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडून हा प्रश्न तडीस नेला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. फलटण, माळशिरस भागातील शेतकऱ्यांसाठी निरा-देवघर धरणातील पाणीसाठ्यापैकी ११.७३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना सरकारने हे सूत्र बदलून निरा डाव्या कालव्यातून बारामती भागाला ६० टक्के व उर्वरित फलटण, माळशिरस भागाला निरा डाव्या कालव्यातून ४० टक्के पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थगिती देत आज राज्य शासनाने उर्वरित काम पूर्ण करून लवकरात लवकर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे फलटण तालुक्यातील ५६ गावे, तर माळशिरस तालुक्यातील २० गावे ओलिताखाली येणार आहेत.
या निर्णयाचे स्वागत फलटण तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी फलटण शहरातील चौकाचौकांत व ग्रामीण भागात प्रत्येक लाभक्षेत्रातील गावांत फटाक्यांची आतषबाजी करीत केले.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेतील अडचणी दूर करा, सांगोला उपसा जलसिंचन योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा, फलटण-पंढरपूर रेल्वे ‘डीपीआर’ला मान्यता, फलटण तालुक्यातून विद्युत रोहित्र चोरी जात असल्याचे प्रकार गंभीर असून, यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत; तसेच कुकडी लाभक्षेत्रात येणाऱ्या करमाळा उत्तर भागातील गावांना पाणी पोचविण्याचे काम पूर्ण करा, असेही निर्देश दिले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार