जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. जितेंद्र सुतार यांच्या हस्ते ‘स्मृतीरंग ७५’ (पुष्प १३) चे उद्घाटन

6

चिंचवड, २१ डिसेंबर २०२२ : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्ताने संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीच्या चित्रशिल्पहस्त कला विभागातर्फे स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिलेल्या क्रांतिकारकांच्या स्मृतींना रंगरेषांद्वारे उजळविण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्याचे योजिले आहे. प्रत्येक आठवड्यात चार कलासाधक असे २० आठवड्यांत एकूण ७५ कलासाधक (पिंपरी-चिंचवड परिसरातील) आपली कला रसिकांसमोर प्रदर्शित करणार आहेत.

स्मृतीरंग ७५ (पुष्प १३) या पिंपरी-चिंचवड परिसरातील चार कलाकारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजता जागतिक कीर्तीचे शिल्पकार श्री. जितेंद्र सुतार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. संस्कार भारतीच्या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. श्री. जितेंद्र सुतार यांचे स्वागत संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर व चित्रशिल्पहस्तकला विभागप्रमुख श्री. योगेश दीक्षित यांनी केले.

श्री. जितेंद्र सुतार यांनी (Balance) ‘समतोल’ या विषयानुसार तयार केलेली शिल्पे देश-विदेशांत आहेत. यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.

सर्व सहभागी कलाकार श्री. विश्वनाथ खिलारे, श्री. अरविंद खंडकर, सौ. भारती कर्डीले, सौ. सुनीता आचार्य यांचे श्री. जितेंद्र सुतार यांच्या हस्ते पुष्प देऊन अभिनंदन केले.

संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीच्या सचिव सौ. लीना आढाव यांनी संस्कार भारतीच्या कार्याचा व दृश्यकला विभागाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. जितेंद्र सुतार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम जरी औपचारिक असला, तरी सर्व वातावरण एकदम घरगुती आहे, असे सांगून त्यांनी सर्व कलारसिकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रदर्शनात सहभागी प्रत्येक कलासाधकाशी त्यांच्या चित्रांबद्दल चर्चा केली. सर्व कलाकारांच्या कामातून त्यांची जडण-घडण व कलेविषयीची तळमळ जाणवते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले व सर्व कलाकारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमासाठी संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीच्या सचिव सौ. लीना आढाव, उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, चित्रशिल्पहस्तकला विभागप्रमुख श्री. योगेश दीक्षित, कलासाधक व कलारसिक उपस्थित होते. संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समितीच्या चित्रशिल्पहस्तकला विभागाचे सहप्रमुख श्री. रमेश खडबडे
यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्मृतीरंग ७५ (पुष्प १३) हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. २५ डिसेंबर २०२२) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी पी. एन. गाडगीळ कलादालन, चिंचवडगाव येथे विनामूल्य खुले आहे; तसेच रविवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता चित्रकार श्री. विश्वनाथ खिलारे यांचे जलरंगातील व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक होणार आहे. तरी सर्व कलासाधकांनी प्रदर्शनाचा व प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा, ही विनंती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील