पुणे, १३ सप्टेंबर २०२३ : ‘चंद्रयान’ मोहिमेनंतर ‘आदित्य’ यानाचे प्रक्षेपण यशस्वी होताच आता ‘नासा’ने मैत्रीचा हात पुढे करीत ‘इस्त्रो’ सोबत अवकाशात निरीक्षण शाळा पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. जगातील दोन दिग्गज अंतराळ संस्थांचे शास्त्रज्ञ एकत्र येत, पृथ्वीचा विशेष अभ्यास करणार आहेत. या निरीक्षण शाळेची निर्मिती नासामध्ये सुरू असून, जानेवारी २०२४ मध्ये ती अंतराळात झेप घेणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने पृथ्वीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी निरीक्षण शाळा तयार केली जात आहे. नासा आणि इस्त्रोचे शास्त्रज्ञ प्रथमच मोठ्या प्रयोगासाठी एकत्रितपणे ही मोहीम राबवत असून, या मोहिमेला ‘निसार’ असे नाव देण्यात आले आहे. ही निरीक्षण शाळा नासाच्या प्रयोगशाळेत तयार होत आहे. तेथे इस्त्रो व नासाचे शास्त्रज्ञ एकत्रित काम करीत आहेत.
२०२४ मध्ये ही शाळा अंतराळात पाठवली जाणार आहे. ही निरीक्षण शाळा बारा दिवसांत पृथ्वीचा नकाशा तयार करुन तिचे मॅपिंग करेल. ग्लोबल वॉर्मिंग स्थिती, भारतीय किनारपट्टी व अंटार्क्टिकावर झालेले बदल याचा अभ्यास केला जाणार आहे. याचे पेलोड तयार करणे, हे आव्हानात्मक काम भारतीय शास्त्रज्ञ करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर