वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांची रिठ्याच्या पानांची पूजा संपन्न

पुरंदर दि.२४ ऑक्टोबर २०२० : पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या परंपरेनुसार सातव्या माळेचा रात्रीचा छबिना संपल्यानंतर देवाला रिठ्याची पूजा करण्याची परंपरा आहे. आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही पूजा संपन्न झाली

नवरात्र काळात उपवास व अखंड जागरणामुळे श्रीनाथ महाराज व श्रीजोगेश्वरी माता यांच्या अंगातील उष्णता वाढून दाह होतो. त्यामुळे हा दाह कमी करण्यासाठी उष्णताहारक थंड गुणाच्या रीठा या वनस्पतीचा उपयोग या पूजेसाठी करण्यात येतो. महाष्टमीच्या या महापूजेसाठी आवश्यक असणारी रिठ्याची पाने सालकरी_फुलमाळी (धसाडे व वाघ) यांच्याकडुन आणून दिली जातात. तसेच गुरव-पुजाऱ्यांकडून शेंदूरलेपन केले जाते. त्यानंतर दीक्षित (सोनार) परिवाराकडून रिठ्याच्या पानांचे अंगरखा, आईसाहेबांचे नथ, कंठी, मंगळसूत्रादी दागिने, पुष्पहार, चंद्र, सूर्य, तारका, शेषनाग, गजमुख, प्रणव, स्वस्तिक, तसेच त्रिशूळ, डमरू, तलवार ही आयुधे बनवली जातात.श्रीनाथ महाराजांची नामाक्षरे या विविध आकारातील सुबक नक्षीकाम करून श्रीनाथ म्हस्कोबा व श्रीजोगेश्वर यांच्या स्वयंभू मूर्तीवर मोठ्या कौशल्याने बसविले जातात. संपूर्ण वर्षातून फक्त एकदाच होणारी ही महापूजा परंपरेनुसार श्रीक्षेत्र वीर येथील सोनार समाजातील दीक्षित परिवाराच्या हस्ते करण्यात येते.

आज ही पूजा पारंपारिक पद्धतीने पार पडली. यावेळी मानकरी पुजारी व सेवेकरी उपस्थित होते. कोरोणामुळे ही पूजा थोड्या लोकांच्या उपस्थितीत पार पडली.

न्युज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा