कुस्तीपटू सुमीत मलीक डोपींगमध्ये फेल, भारताने गमावला ऑलिम्पिक कोटा

नवी दिल्ली, ८ जून २०२१: टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच भारताला एक मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू सुमीत मलिक डोपिंगमध्ये फेल झाल्यामुळे आता त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. याचसोबत १२५ किलो वजनी गटात आता सुमीत मलिकऐवजी भारताला  इतर कोणताही कुस्तीपटू पाठवता येणार नाही. तसेच  याप्रकरणी कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियावर १६ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी भारताची मात्र नाचक्की झाली आहे.
सुमीत मलिक हा  बुल्गारिया येथे आयोजित जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता फेरी दरम्यान घेतलेल्या सॅम्पलमध्ये पॉझिटिव्ह सापडला आहे. ही स्पर्धा जागतिक कुस्ती फेडरेशन अंतर्गत घेण्यात आली होती. सुमीत मलिक ए सॅम्पलमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्याच्या बी सॅम्पलचे परीक्षण केले जाणार आहे. बी सॅम्पलचा निकाल आल्यानंतरच सुमीत मलिकला जागतिक ॲण्टी डोपिंग एजंसी व जागतिक कुस्ती फेडरेशनसमोर आपली बाजू मांडता येणार आहे. कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियालाही आता आपली बाजू मांडावी लागणार आहे.
सुमीत मलिकचे नमुने हिंदुस्थानातील राष्ट्रीय ॲण्टी डोपिंग एजन्सीकडून घेण्यात आले असते आणि यात तो पॉझिटिव्ह सापडला असता तर देशातील इतर खेळाडूला कोटा देण्यात आला असता, अशी माहिती कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी या वेळी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा