नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३ : कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक आज म्हणजेच गुरुवार, १० ऑगस्ट रोजी दिल्लीतील राजघाट येथे दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या निवडणुका २ दिवसांनी होणार आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि देशातील अनेक आघाडीच्या कुस्तीपटूंनी काही काळापूर्वी दिल्लीच्या जंतरमंतरवर ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात धरणे आंदोलन केले होते. त्याच वेळी, एका अल्पवयीनासह ७ महिला कुस्तीपटूंनी माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले होते, जे न्यायालयात प्रलंबित आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रावर आज सुनावणी होणार आहे.
१२ ऑगस्ट रोजी WFI निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल देखील घोषित केले जातील. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या लोकांनीही यावेळी WFI निवडणुकीत अर्ज दाखल केले आहेत. दिल्ली कुस्ती संघटनेचे प्रमुख जय प्रकाश आणि यूपी कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष संजय सिंग हे त्यापैकी प्रमुख आहेत. या सगळ्यात कुस्तीपटू आज अचानक पत्रकार परिषद घेणार आहेत. अशा स्थितीत या परिषदेत मोठा खुलासा अपेक्षित आहे. साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी बुधवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. काही कुस्तीपटूंना सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांमधून सूट देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड