‘या’ दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता: भुजबळ

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे अर्थात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
मुख्यमंत्रांसोबतच तीनही पक्षांच्या प्रत्येकी २ आमदारांनी मंत्रिपदासाठी शपथ घेतली. मात्र यानंतर अजूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. राज्यातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल याविषयी खुद्द मंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.

यावेळी भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. अधिवेशनानंतर ताबडतोब अगदी दुसऱ्यादिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मला वाटते.
कामकाजांना काही अडचणी येतील, अस मला वाटत नाही. उगाचच लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला आहे. २५वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. शिवसेनेच्या कामात आम्ही सोबतच होतो.
त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव चांगलाच आहे, ते स्पष्टवक्ते आहेत. खरं बोलणारे आहेत. एखादी गोष्ट पटल्यानंतर तातडीने निर्णय घेतात.
दरम्यान, भुजबळ यांनी यावेळी भाजपातील ओबीसी नेत्यांना अन्याय सहन झाला नाही किंवा होत नसल्यामुळेच ते जनतेसमोर आलेले आहेत, असेही वक्तव्य केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा