मुंबई, 21 जून 2022: काहीश्या विलंबां नंतर विधान परिषदेचा निकाल लागला. राज्यसभा प्रमाणं विधान परिषदेतही फडणवीसांची खेळी काम करेल का असा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र यंदाही त्याची पुनरावृत्ती झालेली दिसतेय. भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झालाय. त्यामुळं महाविकास आघाडीला मोठा झटका बसलाय.
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. त्याचप्रमाणं राष्ट्रवादीचेही दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येणार हे निश्चित होतं. पण राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना पराभूत करण्याचा भाजपचा डाव अपयशी झाला. राष्ट्रवादीसाठी एकनाथ खडसे निवडून येणं महत्त्वाचं होतं.
शिवसेनेने आमषा पाडवी आणि सचिन अहिर यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली होती. या चारही जागा निवडून आल्या आहेत. काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप असे दोन उमेदवार दिले होते. पण चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव काँग्रेसला पहावा लागलाय.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने मतांच्या जुळवाजुळवीत यश मिळवलं होतं ते यंदाही मिळवलंय. भाजपाने उमा खापरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे या पाच जणांना रिंगणात उतरवले होते आणि हे पाचही उमेदवार निवडून आलेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे