“ऐ मेरे वतन के लोगो” लिहिणारे कवी प्रदीप यांचा आज स्मृतिदिन

मुंबई : प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे व डोळ्यात पाणी आणणारे अजरामर गीत ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे लिहिणारे रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा आज स्मृतिदिन.त्यांच्याविषयी थोडेसे….

उज्जैनजवळ जन्मलेले रामचंद्र नारायण द्विवेदी हे अवघ्या देशभर लोकप्रिय झाले ते कवी प्रदीप म्हणून. शाळकरी वयापासूनच ते कविता करत व त्यांनी कॉलेजवयात कविसंमेलने गाजवली.
ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळयांत धूळ फेकणारे प्रदीप यांचे ‘दूर हटो ये दुनियावाले’, ‘हिंदुस्तान हमारा है’ हे किस्मत चित्रपटातील गीत अत्यंत गाजले. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती व देशवासीयांमध्ये जागृती निर्माण करण्याची तळमळ होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशू राय व देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जीच्या हातात गेली. शशधर यांनी कवी प्रदीप यांच्याकडून ‘किस्मत’, ‘कंगन’, ‘बंधन’, ‘झुला’ आदी चित्रपटांची गीते लिहून घेतली.
स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तीपर गीते व कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकांचे रक्त उसळत असे. त्यांना कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते.

माहीमच्या फुटपाथवर चालताना त्यांना ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे सुचले. सुचल्यानंतर तेथे पडलेल्या सिगारेटच्या रिकाम्या पाकिटावर त्यांनी हे गाणे लिहिले.

‘देदी हमें आज़ादी बिना खडग बिना ढाल’ हे गीत पाकिस्तानी लोकांना इतके आवडले की, पाकिस्तानी चित्रपटात ते ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आजम तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित केले.

‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की’ गाण्याचे पाकिस्तानात ‘आओ बच्चो सर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले.
आपल्या आयुष्यात तब्बल १७०० गाणी लिहिणाऱ्या प्रदीप यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले गेले. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ मध्ये निधन झाले. आज ते आपल्यातून निघून गेले असले, तरी देशभक्तीपर गीते व कवितांद्वारे मना- मनात घर करून आहेतच!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा