पुणे, १६ सप्टेंबर २०२३ : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असुन मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाचा जोर हळूहळू वाढणार असल्याची माहितीही हवामान खात्याने (आयएमडी) दिली आहे.
याबाबत माहिती देताना हवामान खात्याने सांगितले की, आजपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. मान्सूनची प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने गुजरात राज्यात १७ आणि १८ तारखेला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, रब्बी हंगामातील पावसाच्या उर्वरित दोन दिवसांत (२५ ते ३० सप्टेंबर आणि ९ ते १३ ऑक्टोबर) चांगला पाऊस अपेक्षित आहे. अशा स्थितीत आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड