टोकियो, १६ सप्टेंबर २०२०: जपानच्या संसदेने बुधवारी योशिहिडे सुगा यांना नवीन पंतप्रधान म्हणून निवडलं. तब्बल ८ वर्षांनंतर सुगा देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवडले गेले. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाकडं बहुमत असलेल्या संसदेच्या खालच्या सभागृहानं त्यांना मतदान केले. याआधी माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राजीनामा दिला होता. जपानचे पंतप्रधान पद सर्वाधिक काळ भूषवणारे अाबे यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या तक्रारींमुळं आपलं पद सोडलं होतं. मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा हे बऱ्याच काळापासून अाबेंचा उजवा हात आहेत. सोमवारी ते गव्हर्निंग लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नवे प्रमुख म्हणून निवडले गेले.
२००६ मध्ये आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात सुगा हे त्यांचे निष्ठावंत समर्थक राहिले. आबे यांचा कार्यकाळ आजारपणामुळं अचानक संपण्याच्या मार्गावर असताना सुगा यांनी २०१२ मध्ये अाबे यांना पंतप्रधानपदावर परत येण्यास मदत केली.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना योशीहिदे सुगा यांनी पक्षात स्वत:चे स्थान निर्माण केले. पक्षातील दिग्गज नेत्यांचे समर्थन मिळवण्यात ते यशस्वी झाले. आकिताच्या उत्तर प्रांतातील स्ट्रॉबेरी उत्पादकाचा मुलगा ही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. त्यामुळेच नवी जबाबदारी पेलताना सामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील जनतेचे हित साधण्याचे वचन देण्यावर त्यांनी जोर दिला आहे.
शिंजो आबे यांनी वैद्यकीय कारणास्तव जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय २८ ऑगस्टला जाहीर केला होता. त्यावेळी विनम्रपणे झुकून त्यांनी जपानी जनतेची माफी मागितली होती. ६५ वर्षीय शिंजो आबे गेल्या अनेक वर्षांपासून ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’ या आतड्यांसंबंधी आजाराने त्रस्त आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे