तुम्ही जिम सुरु करा, बाकी मी बघतो – राज ठाकरे 

मुंबई, दि. ११ ऑगस्ट २०२०: राज्यात कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक उद्योगांसह हॉटेल, मॉल्स, जिम इत्यादी बंद असल्यानं या व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसलाय. राज्य आता अनलॉकच्या दिशेनं जात असताना काही उद्योगांना सरकारनं परवानगी दिली आहे. मात्र व्यायामशाळा म्हणजेच जिम यांना अजूनही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे या जिम मालकांनी आपली समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडे मांडली आहे. 

राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवास्थानी जिम मालकांनी भेट घेऊन आपल्या समस्या मांडताना ठाकरेंना सांगितलं कि, सततच्या लॉकडाऊनमुळे आमचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. त्यामुळे आता तरी जिम सुरु करण्याबाबत सरकारनं परवानगी द्यावी. आम्ही केंद्र सरकारने सांगितलेल्या सर्व गाईडलाईन्स आणि नियमांचं पालन करून जिम सुरु करू. त्यामुळे राज ठाकरेंनी सरकारला आमच्या समस्येबाबत माहिती द्यावी अशी भूमिका जिम व्यावसायिकांनी मांडली . 

जिम व्यावसायिकांशी बोलताना राज म्हणाले कि, तुम्ही किती दिवस जिम बंद ठेवणार? तुम्ही जिम चालू करा. पुढंच पुढं बघू. ज्याला यायचं तो येईल. केंद्र सरकारनं जिम सुरु करायला परवानगी दिली असताना राज्य सरकार अजूनही परवानगी देत नाही, राज्य सरकारला जास्त अक्कल आहे का? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे राज ठाकरे म्हणाले, मीही टेनिस आणि गोल्फ खेळणं चालू केलंय, आता याच्यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्स कोणत्या खेळात असेल? ‘एक मधू इकडे तर एक चंद्र तिकडे’ असं म्हणत राज यांनी जिम सुरु करा पुढे मी बघतो असं आश्वासन जिम व्यावसायिकांना दिलं. 

त्याचप्रमाणे, मी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांशी याबाबत बोललो असून ते सुद्धा हा मुद्दा उचलणार आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच तुम्ही जिम सुरु करताना काय काय काळजी घ्याल ते आधी मला सांगा. योग्य ती खबरदारी घेउन आपलं काम सुरु करा. जिम चालू करून आपली इम्युनिटी वाढावा असंही राज ठाकरे म्हणाले. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा