युवा कॉंग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या

फरीदकोट, १९ फेब्रुवरी २०२१: पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यात युवक कॉंग्रेसचे नेते गुरलालसिंग भुल्लर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. गुरलाल यांना गुरुवारी सायंकाळी दोन दुचाकीस्वार अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाब डीजीपीला कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. कॉंग्रेस नेते गुरलालसिंग भुल्लर यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले आहे की, फरीदकोट युवक कॉंग्रेस अध्यक्षांवर हल्ला झाल्याची घटना धक्कादायक आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याचे निर्देश मी पंजाबच्या डीजीपीला दिले आहेत. या जघन्य प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल.

असे सांगितले जात आहे की, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी फरीदकोट येथील ज्युबिली चौकात कॉंग्रेस नेत्यावर अनेक गोळ्या मारल्या. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरलाल सिंग हे फरीदकोट जिल्ह्यातील युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

वृत्तसंस्थेशी बोलताना फरीदकोट एसपी म्हणाले की, गुरलालसिंग भुल्लर यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी दहापेक्षा जास्त गोळ्या मारल्या. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. या क्षणी हल्लेखोर अद्याप फरार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा