बीड.दि. २३ एप्रिल २०२०: लॉकडाऊनमुळे संचारबंदी लागू असतानाही मोरेवाडी परिसरात रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या तीन तरुणांना अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस नाईक गोविंद येलमाटे यांनी हटकल्याचा राग आल्याने त्या तिघा तरुणांनी येलमाटे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी(दि.२२) रोजी रात्री घडली.याप्रकरणी तिघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घरात बसावे यासाठी प्रशासनाकडून सतत जनजागृती करण्यात येत आहे. तरीही नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.ते विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
या फिरणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गोविंद अंगद येलमाटे हे एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मोरेवाडी परिसरातील यशवंत नगर भागात गेले होते. यावेळी त्यांना किशोर कालिदास लोमटे, वैभव बाबू आखाते (दोघेही रा. मोरेवाडी), आणि तुषार नानासाहेब शिनगारे (रा. आवसगाव, ता. केज) हे तीन तरुण संचारबंदीचे आदेश डावलून रस्त्यावर उभे राहून गप्पा मारत असलेले दिसले .
त्यावर येलमाटे यांनी त्या तरुणांना रस्त्यावर का थांबलात? म्हणून विचारणा केली असता याचा राग त्या उभ्या असलेल्या तरुणांना आला.त्यावर त्या तरुणांनी येलमाटे यांना मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही तरुणांवर कलम ३५३, ३३२, १८८, २६९, २७०, ५०४, ३४ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे हे करत आहेत.