नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर २०२० : कोविड-१९ नंतरच्या काळात तंत्रज्ञान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार असून आय आय टी च्या विद्यार्थ्यांनी देशाच्या गरजा ओळखून त्यासाठी नवोन्मेषांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं केलं. नवी दिल्ली इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी दिल्लीचा ५१ वा वार्षिक पदवीप्रदान समारंभ आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. त्यामध्ये अध्यक्षस्थानावरून पंतप्रधान बोलत होते. आय आय टी दिल्ली यंदा आपला हीरक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्त आणि आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कोविड-१९ च्या वैश्विक आपत्तींनं जागतिकीकरणाबरोबरच आत्मनिर्भरतेचं महत्त्व अधोरेखित केलं. देशातील सर्वसामान्य माणसाचं जीवन सुकर करण्याचं सामर्थ्य नवोन्मेषांमध्ये असून गावागावातल्या गरीबातल्या गरीब माणसापर्यंत हे तंत्रज्ञान पोचलं पाहिजे, तरच त्यांचं जीवन अधिक सुखकर होऊ शकेल, असं पंतप्रधान म्हणाले.
पूरपरिस्थिती, चक्रीवादळ यांच्यापासून रक्षण करणारं, त्यांची आगाऊ सूचना देणारं नवं तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज आहे. अशा नव्या संशोधनाला चालना देण्यासाठीच सरकारनं स्टार्टअप्स ना प्रोत्साहन दिलं असून सध्या देशात फिनटेक, कृषी, वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित ५० हजारांहून अधिक स्टार्टअप्स यशस्वीरित्या काम करत आहेत. ट्रेडमार्क नोंदणीमध्ये ५ टक्के, पेटंट नोंदणीमध्ये ४ टक्के वाढ झाली असून व्यवसाय सुलभतेसाठी देशातील कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यावेळी उपस्थित होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात इतर सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक ऑनलाइन वेबकास्टच्या माध्यमातून समारंभात सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी