सांगावीतील जिल्हा परिषद शाळेला राज्यशासनाच्या आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

बारामती, २७ ऑक्टोबर २०२० : बारामती तालुक्यातील सांगवी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची राज्य शासनाकडून आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या एकुण ३०० जिल्हा परिषद शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड केली आहे. यामध्ये सांगवीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली आहे.

शाळेतील भौतिक सुविधा, दर्जेदार शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय बाबी आदी गुणांच्या मुद्द्यावर ही निवड करण्यात आली आहे. शाळेसाठी पदाधिकारी, पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी ही अभिमानास्पद व आनंददायी बाब आहे. सध्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारावर सांगवी प्राथमिक शाळेचे गौरव झाला आहे. नव्या युगाकडे शिक्षणाची वाटचाल सुरू आहे. मराठी शाळेचा विद्यार्थी पट ढासळत चालला असून, शिक्षणाचा दर्जा देखील खालावतो आहे. मात्र, सांगवी प्राथमिक शाळेने आपला दर्जा कायम टिकवून दर्जेदार उत्कृष्ट शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी कला, क्रीडा, सांस्कृतिक, अशा अनेक क्षेत्रात सांगवीची शाळा स्पर्धेसाठी आघाडीवर असते, प्राथमिक शाळेचा एकूण पट ३७१ असून १३ शिक्षक कार्यरत आहेत . तर आता पर्यंत या शाळेतील ८ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सांगवीच्या शाळेसाठी दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडून १५ लाख रुपयांची प्रयोग शाळा उपलब्ध झाली होती तर ७ स्मार्ट टीव्ही, २ स्क्रीन टच टीव्ही, ३ प्रोजेक्टर आहेत. शासकीय अनुदानातून सांगवीच्या प्राथमिक शाळेला एकुण ११  डिजिटल रूमचे साहित्य देण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण शाळाच आता डिजिटल झाली असून विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. तर सांगवी ग्रामपंचायत कडून शाळेसाठी विविध साहित्य उपलब्ध करून, शाळेतील रंगरंगोटीसाठी १४ व्या वित्त आयोगातून निधी देण्यात आला असल्याची माहिती सांगवी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व स्कूल कमिटी सदस्य पोपट तावरे यांनी दिली. तसेच स्मार्ट मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहे. स्मार्ट मोबाईल आणि डिजिटल क्लासरूममुळे सर्व चित्ररुपी माहिती मिळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. आधुनिक काळानुसार विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी प्रगतीची दिशा मिळत आहे. ९ जानेवारी २०१७ च्या जलदप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम शासन परिपत्रकानुसार डिजिटल क्लासरुमची निर्मिती करण्यात आली आहे.

डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची जलदगतीने माहिती प्राप्त होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची देखील सोय आहे. मराठी माध्यमाबरोबरच इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत सेमी इंग्लिशचे क्लास घेण्यात येत असतात, यामुळे सांगवी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तर सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत व आता देखील शाळा बंदच्या दरम्यान सर्व वर्गातील शिक्षक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे दररोज एक ते दीड तास अभ्यासक्रम घेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा