पुणे, २८ ऑक्टोबर २०२२ : टी ट्वेंटी विश्वचषक सुपर – १२ च्या महत्त्वपूर्ण सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १ धावेने पराभव केला. यामुळे पाकिस्तानचे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आव्हान आणखी कठीण झाले आहे. झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेल्या १३१ धावांचं आव्हान पाकिस्तानला पूर्ण करता आलं नाही.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सेन विल्यम्स यांच्या ३१ धावांच्या जोरावर झिम्बाब्वेने २० ओव्हर मध्ये फक्त १३० धावांपर्यंतच मजल मारू शकले.
झिम्बाब्वेने दिलेल्या १३१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच झिम्बाब्वेच्या गोलंदाजानी धक्के देण्यास सुरुवात केली. मोहम्मद रिझवान (१४) आणि बाबर आजम (४)धावावर स्वस्तात तंबूत परतले. भारताविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करणारा इफ्तीखार अहमदचा यावेळी नवख्या झिम्बाब्वेच्या गोलंदाजीसमोर टिकाव लागला नाही. तो १० चेंडूत ५ धावा करून बाद झाला. यानंतर पाकिस्तानच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. फक्त शान मसूद याने ३८ चेंडूत ४४ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी त्याला सिकंदर रझा याने बाद केलं. त्यानंतर सतत विकेट गमावल्यामुळे पाकिस्तानचा संघ २० षटकात ८ विकेट्स गमावत १२९ धावाच करू शकला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव