झोमॅटो बॉईज गेले संपावर

पुणे : ऑनलाइन खाद्य पुरविणाऱ्या ‘झोमॅटो’ या फूड कंपनीकडून ग्राहकांना घरपोच खाद्यपुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी बॉइजनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज सकाळपासूनच संप पुकारला आहे. त्यामुळे झोमॅटो कंपनीची सेवा चांगलीच विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथून जवळपास सातशेच्यावर कर्मचारी झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयासमोर सोमवारी(दि.१३) रोजी जमा झाले होते. शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, निगडी येथील बहुसंख्य डिलिव्हरी बॉइजनी ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीचे काम थांबविल्याने झोमॅटोची सेवा विस्कळित झाली होती. झोमॅटोच्या बाणेर येथील कार्यालयातील व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालू ठेवणार असल्याचे अतुल डोके या तरुणाने सांगितले.
कंपनीने अचानक दरपत्रक बदलून पुरवठा दर (डिलिव्हरी चार्ज) कमी केले आहे. याबाबत कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढणे, वेळेचे बंधन, मल्टी ऑर्डर यासारख्या बाबींविरोधात आम्ही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली होती.
यावर निर्णयासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी मागितला होता; परंतु तेवढ्या कालावधीत प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा संप पुकारल्याचे संपाचे समन्वयक झेड. अप्पासाहेब यांनी सांगितले. तर कंपनीने कर्मचाऱ्यांनी समस्या कुणाकडे मांडाव्यात यासाठी व्यवस्थापकाची नियुक्तीसुद्धा केलेली नाही. यामुळे अडचणी कुणाकडे मांडायच्या, हा प्रश्न असल्याचे डिलिव्हरी बॉयने सांगितले.

सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात, लांबचे पिकअप व ड्रॉप देऊ नयेत. जुन्या व ज्यांना कामावरून कमी केलेले आहे, अशा मुलांना पुन्हा कामावर घ्यावे. रायडरसोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही विमा उतरविला जावा. तसेच समान प्रोत्साहन भत्ता दिला जावा. तसेच, ऑर्डरचे दर वाढविण्यासह वेळेचे बंधन असू नये. नोटीस न देता कामावरून कमी करू नये.अशा प्रकारच्या मागण्या या बॉईजनी केल्या आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा