राज्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव, परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

16
परभणी, ११ जानेवारी २०२१: देशातील सात राज्यांना विळखा घातल्यानंतर अखेर बर्ड फ्ल्यू ने महाराष्ट्रात देखील एन्ट्री केली आहे. परभणीच्या गुरुंबा गावातल्या ८०० कोंबड्या बर्ड फ्ल्यूच्या शिकार बनल्या आहेत. भोपाळ मधल्या प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर परभणी चे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बर्ड फ्लूच्या संसर्गावर शिक्कामोर्तब केला आहे. गुरुंबा गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. तसेच गुरुंबा गावापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या कोंबड्या व इतर पक्ष्यांची खरेदी विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी उद्धव ठाकरे घेणार बैठक
 
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडं परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्यामुळे जिल्ह्यातील ८,००० हजार कोंबड्या मारणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितला आहे. पाच फूट खोलीच्या खड्ड्यांमध्ये कोंबड्या मारून टाकल्या जाणार आहेत. अन्य जिल्ह्यांमध्ये देखील बर्ड फ्ल्यू झाल्याची शक्यता आहे. अंडी आणि चिकन अर्धा तास उकडून खाल्ल्यास कोणताही धोका राहणार नाही असे देखील पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितला आहे.
 
परभणी पासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुंबा या गावांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सात ते आठ पोल्ट्रीफार्म चालवले जातात. या पोल्ट्री फार्म मध्ये अंदाजे आठ हजार पक्षी असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी यातील आठशे पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळमधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल काल रात्री प्राप्त झाला ज्यात स्पष्टपणे बर्ड फ्लू असल्याचे निदर्शनास आले. या नंतर या गावाच्या आसपासचा परिसर इफेक्टेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
 
 
राज्यात बर्ड फ्ल्यू चा आढावा
 
परभणीच्या गुरुंबा गावात ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू
 
सेलू तालुक्यात कुपटा मध्ये ५०० कोंबड्यांच्या मृत्यू अहवाल प्रतीक्षेत.
 
लातूर जिल्ह्यामध्ये केंद्रेवाडी मध्ये ४०० कोंबड्यांचा मृत्यू
 
ठाणे, नागपूर, बीड, अकोल्यामध्ये अनेक पक्षांचा मृत्यू.
 
 
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा