पुणे, ८ जानेवारी २०२३ : बंदी असूनही अनेक शहरांत नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जात आहे. पतंगबाजांचा हा बेदरकारपणा इतरांना वारंवार धोक्याचा ठरत आहे. नागपुरात फारुखनगर भागात याच मांजामुळे एका पाचवर्षीय मुलीचा गळा कापला गेल्याची घटना घडली. या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या गळ्याला ३६ टाके पडले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दुसऱ्या घटनेत येवला (जि. नाशिक) येथे रविवारी (ता. आठ) शहरातील कोटमगाव रोडवर दुचाकीवरून जात असणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरून दहा टाके पडले आहेत.
तिसऱ्या घटनेत नाशिक शहरातील सातपूर, अशोकनगर परिसरात दोन वेगवेगवेगळ्या घटनांत अकरावर्षीय बालक व दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे जखमी झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे. जुनेद शेख (३०, रा. नवीन नाशिक) हे आपल्या दुचाकीने प्रगती शाळेजवळून घरी जात होते. त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. हाताने मांजा काढण्याच्या प्रयत्नात शेख यांचा तोल जाऊन रस्त्यावर पडले. सायंकाळी रस्ता अतिशय व्यस्त असतो. सुदैवाने रस्त्यावर वाहतूक नसल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र यात त्यांचे दोन्ही हात व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
अन्य एका घटनेत जाधव संकुल, अशोकनगर परिसरात सायंकाळी मैदानात खेळताना सिद्धेश जाधव (११, रा. जाधव संकुल) यांच्या हातात नॉयलॉन मांजा अडकला. या घटनेत त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. जखम इतकी गंभीर होती, की त्यावर सहा टाके घालण्यात आले. त्वरित उपचार केल्याने बोटे थोडक्यात वाचली आहे.
या घटना ताज्या असतानाच सोमवारी (ता. नऊ) सायंकाळच्या सुमारास नागपूर येथील यशोधरानगरमधील समर्पण रुग्णालयाजवळ १८ वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला. शहानवाज गयासुद्दीन मलिक असे मुलाचे नाव आहे. सायंकाळच्या सुमारास तो सायकलवरून जात असताना, अचानक नायलॉन मांजाने तो जखमी झाला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
या घटनांमुळे प्राणघातक नायलॉन मांजाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नायलॉनच्या मांजाने आतापर्यंत अनेक मुलांचा बळी घेतला आहे. त्याचबरोबर दरवर्षी अनेक पक्षी या जीवघेण्या मांजामुळे जखमी आणि मृत्युमुखी पडल्याच्या घटना पहायला मिळतात. जखमी पक्ष्यांना वाचवण्यासाठी सेमिनरी हिल्सच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात हा सेल तयार होईल. या सर्व घटना पाहता, संक्रांतीच्या काळात घराबाहेर पडताना काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टर व वन्यजीवप्रेमींनी दिला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील