तळेगाव दाभाडे शहराच्या राजकारणात आणि लोकशाही प्रक्रियेत लक्षणीय वाढ झाली आहे! तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, शहरात १९ हजार ३७३ नव्या मतदारांची भर पडली आहे. यामुळे तळेगाव दाभाडेतील एकूण मतदार संख्या ४५ हजार ३०५ वरून ६४ हजार ६७८ पर्यंत पोहोचली आहे. नागरीकरण वाढल्यामुळे मतदारांच्या संख्येत ही विक्रमी वाढ झाली असून, हे शहर लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज झाले आहे.
या वाढलेल्या मतदारांमध्ये पुरुष मतदार ३३ हजार ३०१ तर महिला मतदार ३१ हजार ३७५ आहेत. शहरातील वाढती लोकवस्ती मतदारांच्या संख्येत प्रतिबिंबित झाली आहे.
या निवडणुकीत १४ प्रभागांतून २८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. विशेष म्हणजे, प्रभाग क्र. ९ मध्ये सर्वाधिक ५,८९० मतदार नोंदले गेले आहेत. याव्यतिरिक्त प्रभाग १, २, ३ आणि ११ मध्येही पाच हजारांहून अधिक मतदार आहेत.
प्रारंभिक यादी प्रसिद्ध झाल्यावर ‘पत्ता एका ठिकाणी तर नाव दुसऱ्या प्रभागात’ असल्याच्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या तक्रारींची मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. नागरिकांचे आक्षेप आणि हरकती उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी घेऊन निकाली काढण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची अंतिम यादी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर होईल.
ही अंतिम मतदार यादी आता नगर परिषद कार्यालय व संकेतस्थळांवर मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. विक्रमी मतदारांमुळे यंदाची तळेगाव दाभाडे नगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरणार आहे यात शंका नाही!
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे













































