अखेर तो क्षण आला! राज्याच्या महसूल विभागाला मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल गोळा करण्यामध्ये अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात सध्या तलाठ्यांची हजारो पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामांवर मोठा ताण येत आहे. एकाच तलाठ्याकडे तीन ते चार, तर काही ठिकाणी तब्बल पाच-पाच गावांचा कारभार असल्याने नागरिकांच्या कामांमध्ये होणारा विलंब आता लवकरच संपणार आहे.
१७०० हून अधिक पदांची भरती, कामाचा बोजा होणार कमी!
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच या महत्त्वपूर्ण भरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात तलाठ्यांच्या १,७०० पेक्षा जास्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या मेगाभरतीमुळे सध्या कामाच्या बोज्याखाली दबलेल्या तलाठ्यांना मोठा आधार मिळेल आणि परिणामी, नागरिकांची अनेक प्रशासकीय कामे वेळेत मार्गी लागतील.
महसूल सेवकांना मिळणार ‘स्पेशल’ लाभ!
विशेष म्हणजे, या भरतीमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या महसूल सेवकांना २५ अतिरिक्त गुण मिळणार आहेत. यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना संधी मिळून प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
परीक्षेची पारदर्शकता अत्यंत गरजेची!
एनएसयूआय विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी मात्र या परीक्षेच्या पारदर्शकतेवर बोट ठेवले आहे. ‘मागील वेळी पेपरफुटीची प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे या वेळी राज्यात एकाच वेळी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेऊन ती संपूर्णपणे पारदर्शक घ्यावी,’ अशी त्यांची मागणी आहे. आता महसूल विभाग या भरतीचे वेळापत्रक कधी जाहीर करतो आणि परीक्षेची प्रक्रिया किती जलद व पारदर्शक होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नागरिकांना आता महसूल कार्यालयाच्या कमी फेऱ्या माराव्या लागतील, अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे









































