दादांच्या पक्षाचा आचरट राष्ट्रवाद

“राष्ट्र सर्वेपरी” म्हणजे राष्ट्राला सर्वोच्च मानणे, म्हणजेच देशाला इतर सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवणे. देशाचे हित इथे राहणाऱ्या जनतेच्या हितामध्ये सर्वात जास्त असते. मात्र याच जनतेला गृहीत धरून राज्यकर्ते सत्तेचा उपभोग घ्यायला लागले की सारेच तंत्र बिघडून जाते. राजकारण ही जनतेच्या हिताची जपणूक करण्यासाठीची पायरी मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकारणाचे परिमाण पूर्णतः बदलले आहेत. राजकारणातील सुसंस्कृतपणा तर पूर्णतः लोप पावला आहे. महाराष्ट्रातही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा कधीच मागे पडली आहे. राजकारण हे समाजाच्या कोणत्याही एका घटकाला नव्हे तर संपूर्ण समाजाला सोबत घेऊन त्यांच्या विकासासाठी काम करण्यासाठी करायचे असते. पण असे करताना विरोधी विचारधारा असणाऱ्यांवर बाष्कळ वाटणारी टीका, पांचट विनोद करून त्यांचा स्वाभिमान दुखावणे असे करायची नसते. तेवढा सुसंस्कृतपणा राज्याच्या सुरुवातीच्या काळातील नेत्यांनी नेहमीच पाळला. हे नेते राजकारण करूनच मोठे झाले. मात्र, असे करताना त्यांनी विरोधकांवर पायरी सोडून टीका केली नाही. जनतेच्या भावनेशी कधीही खेळ केला नाही. जनतेला गृहीत धरून राजकारणही केले नाही. त्यांनी नेहमीच आपल्या वागण्या बोलण्यातून सुसंस्कृतपणा जपला.

सुसंस्कृत राजकारणाचे नाव निघाले की माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा नेहमी दाखला दिला जातो. मात्र, सध्याच्या राज्यकर्त्यांपैकी काही जण यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा, सर्वसमावेशकपणा आणि धर्मनिरपेक्षता याचे आपण एकमेव वारसदार असल्याचे सांगत आपल्याला यशवंतरावांचाच वारसा पुढे न्यायचा आहे असे बोलून दाखवत असले तरी, त्यांच्या कृतीतून मात्र तसे कुठेही दिसत नाही. विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी काहीबाही बोलून जो आचरटपणा सुरू ठेवला आहे तो राजकीय कोडगेपणा या श्रेणीमध्येच मोडतो. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्ये पाहिली तर हा पक्ष कोणता धर्मनिरपेक्ष विचार आणि राजकीय सुसंस्कृतपणा पुढे नेणार आहे, असा प्रश्न नक्कीच उभा राहतो.

ज्यांच्या वडिलांची अख्खी हयात धर्मनिरपेक्ष विचारांच्या सावलीत गेली ते राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप ऐन दिवाळीत यावेळी खरेदी फक्त हिंदूंच्याच दुकानातून करा, असा सल्ला जनतेला देतात. महिलांच्या हक्कांसाठी स्थापन केलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या संपदा मुंडे या डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन होईल, अशी खालच्या दर्जाची वक्तव्ये करतात. याच पक्षाचे नागपुरातील पदाधिकारी पक्षाच्या बैठकीत लावणी नृत्यावर ठेका धरतात. त्याआधी याच पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके निवडणुकीमध्ये चपटी, बोटी, आणि लक्ष्मी दर्शन दिल्याशिवाय निवडून येणे अवघड आहे असा सल्ला आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देतात. वरून नंतर आपल्याच वक्तव्यावरून पलटी मारत आपण फक्त विनोद म्हणून आणि कार्यकर्त्यांना हसविण्यासाठी असे बोललो होतो. मी अशा निवडणुका लढवून जिंकलो असे बोललोच नाही, असे सांगतात. महत्त्वाचे म्हणजे लोकांमधून निवडून आलेले आमदार आणि वरिष्ठ पदांवर बसवलेले आपले सहकारी काहीबाही वक्तव्य करीत असताना आणि पक्षाच्या धोरणाची लक्तरे वेशीवर टांगत असताना पक्षाध्यक्ष अजित पवार मात्र या लोकांच्या वक्तव्यांशी आपण सहमत नाही एवढे सांगून नामनिराळे होण्याचा प्रयत्न करतात. पण या लोकांवर कारवाई मात्र काहीच करत नाहीत, हे आश्चर्यजनक आहे. कारण अजित दादांना याच लोकांना सोबत घेऊन पक्ष पुढे न्यायचा आहे आणि त्यांच्याच मदतीने सत्ताही राखायची आहे, असे स्पष्ट दिसते. पण यातून अनेक विषयांवर पक्षात अजितदादांचे काहीही चालत नाही, असा संदेश साऱ्यांसमोर जात आहे, हे नक्कीच खेदजनक वाटते.

गेल्या वर्षी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यात पक्षाचा पदाधिकारी सुरज चव्हाण याने शेतकऱ्यांच्या विषयावर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना धोपटून काढले होते. त्यावेळी अजितदादांनी कारवाईचा बडगा उगारून सुरज चव्हाण पदावरून काढले खरे; पण काही दिवसातच स्वतः तटकरेंनी त्याला पुन्हा पद दिले. हे अजितदादांची पक्षावरील पकड कमी झाल्याचे लक्षण नव्हे तर काय असा प्रश्न सहजच कोणालाही पडेल. महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याप्रती आपण प्रचंड संवेदनशील आहोत असे अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दाखवतो तोच शेतकरी अतिवृष्टीने होरपळल्यामुळे कर्जमाफीची मागणी करत असताना शेतकऱ्यांनी आता कर्जफेडीची सवय लावायला हवी. नेहमी फुकट मागून कसे चालेल, असे वक्तव्य स्वतः अजितदादा करीत असतील तर पक्षाचे इतर नेते बेलगाम बोलणार नाहीत तर अजून काय करतील?.

पक्षाच्या नेत्यांकडून राजकीय विनोदाच्या नावाखाली केला जाणारा आचरटपणा किंवा टगेगिरी पक्षाची भविष्यातील दिशा निश्चित दाखवून देत आहे. विशेष म्हणजे हे फक्त अजित दादांच्या राष्ट्रवादीतच घडते आहे असे नाही तर सत्तेत त्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांचे असंस्कृत वागण्याचे आणि त्यांच्या आचरट वक्तव्यांचे काहीही वाटत नाही हेही तेवढेच गंभीर आहे. सत्तेतील त्यांचा दुसरा सहकारी पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही या साऱ्या बाबी कुठेही खटकत नाहीत. तर विरोधी पक्ष सध्या फोडाफोडीच्या राजकारणाने वैतागला असून अजित दादांच्या पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यावर रान उठवायला त्यांच्याकडे वेळच दिसत नाही.

भाजपसोबत सत्तेत भागीदारी करण्यासाठी काकांची साथ सोडल्यानंतर अजितदादांनी नेहमी स्वतःला यशवंतराव चव्हाण यांचा खरा वारसदार म्हणून प्रोजेक्ट केले. राजकीय विचारधारा पटत नसली तरी आपण केवळ विकासासाठी सत्तेच्या खुर्चीवर भाजपच्या मांडीला मांडीला बसल्याचे अजितदादा वेळोवेळी बोलून दाखवतात. सत्तेत भाजपसोबत असलो तरी यशवंतरावांचा सुसंस्कृत राजकारण, सर्वसमावेशकता आणि धर्मनिरपेक्षता हाच आपल्या पक्षाचा विचार कायम असल्याचेही ते नेहमी सांगतात. मात्र त्यांचे सहकारी सातत्याने आचरट वक्तव्ये करून ही विचारधारा उजळून लावतात आणि अजितदादाही हे सारे सहन करत पुढे चालत राहतात, हे पूर्णतः परस्पर विरोधी नक्कीच वाटते. पक्षाच्या नेत्यांच्या या राजकीय आचरटपणाला खीळ घालण्याची हिंमत आक्रमक वाटणाऱ्या अजितदादांमध्ये राहिलेली नाही की यामागे पक्षातील इतर कोणाचा हात आहे याचा विचार नक्कीच स्वतः अजित दादांना करावा लागणार हे निश्चित!

न्यूज अनकट प्रतिनिधी: भागा वरखडे