पीएमपीला हवीय १२५ एकर जागा बस डेपोसाठी प्रशासनाची धावपळ!

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच मोठी भर पडणार आहे. येत्या चार ते पाच महिन्यांत सुमारे १,२०० नव्या बस दाखल होत असल्याने, पीएमपीचा ताफा लक्षणीयरीत्या वाढणार आहे. मात्र, या वाढत्या ताफ्यासाठी बस डेपो, पार्किंग सुविधा आणि वर्कशॉप्सकरिता जागेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांच्याकडे मिळून जवळपास १२५ एकर जागेची मागणी केली आहे.

सध्या पीएमपीच्या ताफ्यात २,०२५ हून अधिक बस असून त्यापैकी १६०० ते १७०० बस दररोज मार्गावर धावतात. यातून १० लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. प्रवाशांची संख्या पाहता बसची संख्या अपुरी पडत असल्याने पीएमपी स्वमालकीच्या १,००० बस खरेदी करत आहे. या बस मार्च २०२६ पर्यंत दाखल होतील. त्यामुळे पार्किंग आणि डेपोंसाठी जागा मिळणे अत्यावश्यक बनले आहे.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उपलब्ध बससाठीही जागा कमी पडत असल्याने काही बस मुख्य रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात, ज्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. भविष्यात ही समस्या अधिक बिकट होऊ शकते.

पीएमपीने पुणे महापालिकेकडे ६० एकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे ५० एकर, पीएमआरडीएकडे ८ एकर आणि एमआयडीसीकडे ७ एकर अशा एकूण १२५ एकर जागेची मागणी केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, भोसरी, मोशी, देहू आणि आळंदी येथील २५ एकर जागेची कार्यवाही पूर्ण झाली असून ती जागा पीएमपीला लवकरच मिळणार आहे. एमआयडीसीकडे चाकण आणि रांजणगावसाठीही मागणी करण्यात आली आहे.

पीएमपीला मागणीनुसार जागा उपलब्ध झाल्यास, रस्त्यांवरील पार्किंगची समस्या सुटेल आणि पीएमआरडीएच्या हद्दीतही प्रवासी सेवा अधिक चांगल्या प्रकारे विस्तारित करणे शक्य होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे