पंढरीच्या वाटेवर काळाचा घाला! जेजुरी मार्गावर ट्रकच्या धडकेत ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

पुणे: विठुरायाच्या दर्शनासाठी अथांग भक्तीने पायी निघालेल्या वारकऱ्यांवर सोमवारी सकाळी काळाने भीषण घाला घातला. सासवड–जेजुरी मार्गावर एका अनियंत्रित ट्रकने धडक दिल्याने ३ महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पालखी सोहळ्यावर आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Oplus_16908288

हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीकडे जाणाऱ्या मार्गावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर घडला. अपघाताच्या वेळी मुख्य पालखी बोरावके मळा येथे विसावली होती. अपघातग्रस्त ट्रक (MH 26 BE 3367) हा पालखी सोहळ्यासोबतच असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील ‘रंगनाथ महाराज पोखरबिसीकर’ यांच्या दिंडीचा असल्याची माहिती समोर आली आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या महिला वारकऱ्यांची नावे:

अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील रहिवासी आहेत:१. नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज)२. माधवी राजाराम सालगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज)३. राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे दिग्रज, ता. मिरज)या अपघातात जखमी झालेल्या इतर ४ महिलांवर जेजुरी येथील आयसीयू (ICU) रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.

अपघात नेमका कसा झाला?

पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि वाहनांची सुरक्षित हालचाल व्हावी म्हणून रस्ता डिव्हायडरने विभागण्यात आला होता. वाहनांसाठी उजव्या बाजूचा, तर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी डाव्या बाजूचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, प्राथमिक माहितीनुसार काही महिला वारकरी वाहनांच्या मार्गावर आल्या असताना हा अपघात घडला.

पोलिस प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघातानंतर काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

“या अपघातामागील नेमके कारण काय, चालकाची प्रकृती आणि इतर सर्व तांत्रिक बाबींचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश वढणे