पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) महत्त्वपूर्ण बैठकीत दौंडसह ग्रामीण पुण्याच्या विविध प्रश्नांवर आमदार Rahul Kul यांनी प्रशासनासमोर जोरदार मागण्यांचा पाऊस पाडला. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री Sunetra Pawar यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडली.
बैठकीत पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गांवरील प्रस्तावित उन्नत मार्ग (Flyover) कामांपूर्वी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तातडीने ‘वाढीव लेन’ तयार करण्याची आग्रही मागणी आमदार राहुल कुल यांनी केली. “उन्नत मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांना प्रचंड वाहतूक समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आधीपासून नियोजन करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते आणि सामाजिक सभागृहांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
बैठकीत आमदार कुल यांनी दिव्यांग बांधवांसाठीच्या अपंग साहित्य वाटप आणि खेळाडूंसाठीच्या क्रीडा साहित्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ई-निविदा (e-Tender) प्रणालीचा अवलंब करण्याची मागणी केली. मंजूर विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यावरही त्यांनी भर दिला.
पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत बोलताना, जिल्ह्याचा अद्ययावत पर्यटन आराखडा तयार करून ‘किल्ले संवर्धन विशेष मोहीम’ राबवण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी इलेक्ट्रिक पंप मंजूर करावेत, अशी मागणीही त्यांनी प्रशासनासमोर मांडली.
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रस्तावित रिंग रोड, गडकिल्ले आणि अष्टविनायक महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवावी, असेही त्यांनी सुचवले.
या बैठकीस जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्हाधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार राहुल कुल यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.
– पवन साळवे, न्यूज अनकट












































