पुणे: दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एका अज्ञात युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) असे मयत युवकाचे नाव असून, ११ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील श्री. सतीश भास्कर गायकवाड यांच्या मालकीच्या गट नं. २२२ मधील बंद पडलेल्या हॉटेलसमोर ही घटना घडली.
या प्रकरणी अजय अर्जुन गुळमे (रा. केडगाव, ता. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदु किसन जाधव (रा. वांबोरी, ता. राहुरी), राजेंद्र मच्छिंद्र केदारी (रा. सोनाई, ता. नेवासा) आणि आकाश रमेश कांबळे (रा. बासुंबा, जि. हिंगोली) यांच्याविरोधात भा.न्या.सं. कलम १०३, ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींनी अज्ञात कारणावरून सुभाष याच्यावर पोटावर व गळ्यावर मारहाण करून त्याचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर आरोपींनी पळून जाण्यासाठी फिर्यादीची महिंद्रा कंपनीची जीप (क्र. MH-12-W-5207) चोरून नेली. ही जीप नंतर श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे आढळून आली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वागज करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : पवन साळवे











































