नौदलाचा ‘तोतया अधिकारी’ गजाआड; ५ तरुणांना २५ लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला लोणावळ्यात अटक

पुणे (वेब डेस्क): भारतीय नौदलात (Indian Navy) वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून पाच सुशिक्षित बेरोजगार तरुणांची तब्बल २५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका ३२ वर्षीय भामट्याला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी चक्क नौदलाच्या अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून फिरत होता. ‘आयएनएस शिवाजी’ (INS Shivaji) परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आकाश काशीनाथ डांगे (वय ३२, रा. बाडाळी बुद्रुक, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आयएनएस शिवाजी येथे कार्यरत असलेले कैलास बबन नलावडे (वय ५६) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अशी करायचा फसवणूक:

खोटा गणवेश अन् फोटो: आरोपीने नौदलाच्या अधिकाऱ्याचा पांढरा गणवेश परिधान करून स्वतःचे अनेक फोटो काढले होते. हे फोटो मोबाईलवर दाखवून तो तरुणांवर रुबाब झाडत असे.

मोठ्या ओळखीचे आमिष:

“नौदलात माझे मोठे वजन आहे, मी तुम्हाला सहज नोकरी लावून देतो,” असे सांगून त्याने तरुणांचा विश्वास संपादन केला.

२५ लाखांची वसुली:

या आमिषाला बळी पडत सातारा, सांगली, जालना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तरुणांनी नौदलात भरती होण्याच्या आशेने आरोपीच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने एकूण २५ लाख २५ हजार रुपये जमा केले.

असा झाला पर्दाफाश

पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने तरुणांना संशय येऊ लागला होता. दरम्यान, ‘आयएनएस शिवाजी’ येथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयास्पद हालचालींवरून आरोपीची कसून चौकशी केली. त्यावेळी तो नौदलाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचे उघड झाले. सुरक्षा यंत्रणेने तात्काळ त्याला ताब्यात घेऊन लोणावळा शहर पोलिसांच्या हवाली केले.

शासकीय गुपिते अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील खालील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कलम २०४ (लष्करी अधिकाऱ्याचा खोटा वेष धारण करणे)कलम २०५ (खोटी ओळख सांगणे)कलम ३१८(४) (फसवणूक)शासकीय गुपिते अधिनियम (Official Secrets Act) १९२३ मधील कलम ६

पोलीस तपास सुरू:

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड करत आहेत. आरोपीने नौदलाचा अधिकृत गणवेश, बॅजेस आणि इतर साहित्य कुठून मिळवले? तसेच अशाच प्रकारे त्याने आणखी किती तरुणांची फसवणूक केली आहे का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – दिनेश वढणे