दुबईत चौथा आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; CMS संस्थेचा रायगडावर विशेष गौरव

दुबई, १० जून २०२६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुबई येथे आयोजित करण्यात आलेला चौथा आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात, दिमाखात आणि शिवमय वातावरणात संपन्न झाला. छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) या जागतिक मराठी संघटनेतर्फे ग्लेंडेल इंटरनॅशनल स्कूल, ओद मेथा येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, फुजेराह, उम्म अल क्वैन आणि रास अल खैमा येथून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना आणि दीपप्रज्वलनाने झाली. जिजाऊ ब्रिगेड दुबईच्या सदस्यांनी सादर केलेल्या जिजाऊ वंदनेने उपस्थितांना भारावून टाकले. त्यानंतर शिव-शंभू गर्जनेने संपूर्ण सभागृह शिवमय झाले. उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण दणाणून सोडले.

यावेळी शाहीर गंधर्व पृथ्वीराज माळी, शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी, शाहीर चंद्रिका कल्पनाताई माळी आणि त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी शिवकालीन इतिहास जिवंत केला. त्यांच्या शाहिरी सादरीकरणाला उपस्थितांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

स्वामिनी ढोल-ताशा पथक, महिला लेझीम पथक, बालकलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. शिवभक्तीपर गीतांनी आणि शिवगर्जनेने उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव दिला.

CMS संस्थेच्या कार्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी यांचा परस्परसंबंध स्पष्ट करणारे विशेष सादरीकरणही करण्यात आले. तसेच शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.

विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, विचार आणि स्वराज्याची प्रेरणा जगभर पोहोचविण्याचे कार्य केल्याबद्दल CMS – छत्रपती मराठा साम्राज्य या संस्थेचा रायगड येथील शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संस्थेला मानचिन्ह आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. हा सन्मान स्वीकारण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी अभिजित देशमुख रायगडावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जगताप आणि ऋतुजा विचारे यांनी केले. ऑनलाइन प्रक्षेपणाची जबाबदारी सचिन कदम, प्रितेश पटाडे आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी CMSच्या पदाधिकाऱ्यांनी, स्वयंसेवकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी विशेष परिश्रम घेतले.

चौथा आंतरराष्ट्रीय शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता मराठी इतिहास, स्वाभिमान आणि एकात्मतेचा जागर करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला. दुबईमध्ये सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने मराठी अस्मितेचा झेंडा जागतिक स्तरावर अधिक उंचावला आहे.