शासकीय मोजणीदरम्यान मारहाण १४ जणांवर गुन्हा दाखल

‘ही जागा आमची,’ म्हणत जुन्या मालकांचा शासकीय कामात अडथळा थेट कुटुंबाला मारहाण!

पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात जागेच्या शासकीय मोजणीदरम्यान जुन्या मालकांनी व अनोळखी व्यक्तींनी थेट मोजणी अधिकाऱ्यांसमोर अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘ही जागा आमची आहे, मोजणी करायची नाही,’ असे बोलून विरोध करत जमावाने शासकीय कामात अडथळा आणला आणि मारहाण केली.

दुपारी रावेत येथे ही घटना घडली. फिर्यादी अशोक कोंडीबा म्हस्के (६१, रा. रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. म्हस्के हे त्यांच्या जागेची शासकीय मोजणी अधिकाऱ्यांकडून करून घेत असताना, जमिनीचे जुने मालक आणि इतर अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीरपणे घटनास्थळी येऊन गोंधळ घातला.

या जमावातील आदित्य भोंडवे, आदर्श भोंडवे, प्रतीक भोंडवे, आणि यश दत्तात्रय भोंडवे यांनी प्रथम रविराज गायकवाड यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यानंतर, जयश्री भोंडवे हिने फिर्यादीचा मुलगा अक्षय म्हस्के याला पाठीमागून येऊन मारहाण केली. या गंभीर प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी, जुने मालक राजेंद्र तुकाराम भोंडवे, गणेश तुकाराम भोंडवे, यश दत्तात्रय भोंडवे, अमर नितीन भोंडवे, आदित्य राजेंद्र भोंडवे, आदर्श राजेंद्र भोंडवे, प्रतीक गणेश भोंडवे, जयश्री राजेंद्र भोंडवे, नितीन किसन हगवणे आणि इतर चार ते पाच अनोळखी व्यक्ती अशा सुमारे १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी रावेत पोलीस अधिक तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे