“सिक्युरिटीज लिमिटेड” कंपनीत गुंतवणुकीवर बक्कळ नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीला तब्बल ४९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पिंपळे सौदागर परिसरात राहणारे अनिल नामदेव वाबळे (वय ४५) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ऋतिका सिंग नावाच्या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
घडलेली घटना २० जुलै २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडली. आरोपी ऋतिका सिंग हिने व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे फिर्यादी अनिल वाबळे यांच्याशी संपर्क साधला. तिने एका कथित ‘सिक्युरिटीज लिमिटेड’ कंपनीत गुंतवणूक केल्यास कमीत कमी १०, २० आणि ३० टक्के इतका भरघोस परतावा मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून वाबळे यांनी प्रतिसाद दिल्यावर, ऋतिका सिंगने त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर एका विशिष्ट अॅपची लिंक पाठवून वाबळे यांना ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट उघडण्यास सांगितले आणि शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
या प्रक्रियेदरम्यान, फिर्यादी अनिल वाबळे यांच्याकडून एकूण ४९ लाख २२ हजार ४६९ रुपये इतकी मोठी रक्कम आरोपीच्या बँक खात्यावर पाठवण्यात आली. त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सायबर भामट्यांनी आकर्षक परताव्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांना लुबाडण्याच्या घटना वाढत असून, अशा प्रकारच्या ऑनलाईन आमिषांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे









































