पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी (PCMC Election) आरक्षण सोडत जाहीर होताच, शहरातील राजकीय वातावरण एका नव्या वादळाने ढवळून निघाले आहे. पारंपरिक राजकीय पक्षांसाठी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने (Housing Society Federation) थेट आव्हान उभे केले आहे. ‘सोसायट्यांचा निर्धार, पालिकेत आमचाही उमेदवार’ अशी घोषणा करत, शहरातील चार प्रमुख फेडरेशन्स – पिंपरी-चिंचवड, वाकड-ताथवडे, रावेत-किवळे-पुनावळे आणि चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशन निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्याची तयारी करत आहेत.
शहरातील लाखो नागरिक या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहतात. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुर्दशा अशा मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केल्याची तीव्र भावना सोसायटीधारकांमध्ये आहे. “निवडलेले प्रतिनिधी आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. आता आम्ही स्वतःच सभागृहात जाऊन निर्णय घेण्याची वेळ आली आहे,” असे पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी ठामपणे सांगितले आहे.
हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका आता केवळ राजकीय पक्षांची मालमत्ता राहिलेली नाही. नागरिकांच्या समस्यांना स्थानिक स्वराज्यात थेट प्रतिनिधित्व मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. “नव्या विस्तारित भागात नागरिक कर भरतात, पण सुविधा मिळत नाहीत. सोसायटी फेडरेशनचा उमेदवार निवडून आल्यास, तो विकासाचे नवे मॉडेल दाखवेल,” असे मत प्राजक्ता रुद्रवार यांनी व्यक्त केले.
या फेडरेशनकडून नवीन, सुशिक्षित आणि समस्यांची जाण असणारे उमेदवार उभे करण्याची जोरदार हालचाल सुरू आहे. वाकड-ताथवडे सोसायटीचे सदस्य सचिन लोंढे यांनी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. सोसायटीधारकांचा हा ‘जनता उमेदवार’ शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणू शकतो, ज्यामुळे अनेक राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे. हा निर्णय शहरातील सुशिक्षित मतदारांचा कल बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे










































