पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने (उद्धवसेना) शहरातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण होताच, पक्षाने तत्काळ पाऊल उचलत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
शिवसेना भवन, आकुर्डी येथे असे दोन दिवस ही मुलाखत प्रक्रिया पार पडली. पक्षाचे पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील यांनी स्वतः मुलाखती घेतल्या, तर जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख संजोग वाघेरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या मुलाखतींना अपेक्षितहून अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महापालिकेच्या ३२ प्रभागांतील एकूण १२८ जागांसाठी तब्बल १३० इच्छुकांनी मुलाखती दिल्या, तर सहा इच्छुक बाहेर असल्याने मुलाखतींना येऊ शकले नाहीत. याचा अर्थ एकूण १३६ जणांनी उद्धवसेनेकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
“शहरात उद्धवसेनेसाठी वातावरण चांगले आहे. १२८ जागांसाठी १३० जणांनी मुलाखती दिल्या आहेत,” असे मत संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील यांनी व्यक्त केले. इच्छुकांचा हा उत्साह बघता, उद्धवसेनेने निवडणुकीच्या तयारीच्या बाबतीत इतर पक्षांपेक्षा आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मुलाखतीनंतर आता पुढील दिशा ठरवण्यासाठी शनिवारी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर हे इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. त्यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रणांगणात उद्धवसेना पूर्ण ताकदीने उतरण्यास सज्ज झाली असून, इच्छुकांनीही जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
