मोफत ‘ऑनलाइन ओपीडी’ अडचणीत! ई-संजीवनी ॲपवर नोंदणी थाबंल्याने रुग्ण त्रस्त

केंद्र आणि राज्य शासनाने दवाखान्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी ‘ई-संजीवनी’ टेलिमेडिसिन सेवा सध्या तांत्रिक अडचणींच्या गर्तेत सापडल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. घरी बसून मोफत डॉक्टर सल्ला आणि औषधोपचार मिळवण्याची ही सोय असूनही, सध्या ॲपवर नोंदणी होत नाहीये आणि टोकनही मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.

वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजार वाढू लागले असताना ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांसाठी ‘ई-संजीवनी’ची नितांत गरज आहे. भारत सरकारची ही राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा २०१९ मध्ये सुरू झाली आणि कोविड काळात ती अत्यंत उपयुक्त ठरली. आतापर्यंत देशभरात या सेवेद्वारे २७६ दशलक्षाहून अधिक मोफत सल्ले देण्यात आले आहेत.

ई-संजीवनीद्वारे सामान्य ओपीडीसह मानसोपचार, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग आणि त्वचारोग अशा विविध प्रकारच्या विशेषज्ञ सेवा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, अलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे सल्लेही येथे मिळतात. मात्र, सध्या ॲपवर नोंदणी करताना ओटीपी न येणे किंवा टोकन न मिळणे अशा समस्यांमुळे रुग्णांना दवाखान्यांमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

ग्रामीण भागात, जिथे इंटरनेटची गती कमी आहे, तिथे ही समस्या अधिक गंभीर आहे. अनेकदा ही सेवा ‘ओव्हरलोड’ दाखवत असल्याचेही रुग्णांचे म्हणणे आहे.
शहरात ही सेवा पूर्णपणे बंद नसली तरी, सर्व्हर समस्या आणि अपडेट्समुळे तात्पुरते अडथळे येत आहेत. या मोफत आरोग्य सेवेतील तांत्रिक अडथळे त्वरित दूर करण्याची मागणी रुग्ण करत आहेत, जेणेकरून संकटाच्या वेळी ही सेवा गरजू रुग्णांसाठी पुन्हा वरदान ठरू शकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे