राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गडचिरोली दौऱ्याची जय्यत तयारी

गडचिरोली, ४ जुलै २०२३: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी गडचिरोली दौऱ्यावर येणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला त्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेपर्यंत राष्ट्रपती मुर्मू या गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील.

या प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते विविध शाखांच्या परीक्षेत सुवर्ण पदक पटकावलेल्या सहा विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येईल. शिवाय विदयापीठाच्या नवीन परिसरातील कोनशिलेचे अनावरणही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठ परिसरात एक हजार नागरिक बसतील. विदयापीठाच्या शेजारीच असलेल्या औदयोगिक वसाहत परिसरात तीन हेलिपॅड उभारण्यात आली आहेत.

या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी :अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा