रत्नागिरी, २० मार्च २०२३: कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाला संजीवनी देण्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या काजू मंडळाच्या ‘पंचवार्षिक’ योजनेत १.३२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्न वाढीसाठी कोकणातच प्रक्रिया केंद्र करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना कृषी विभागाने केल्या आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रामध्ये काजूची लागवड आहे. या लागवडीतील लाखो टन काजू बोंडे केवळ फेकून दिली जातात. मात्र आता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी मंजूर केला असल्याने त्यातून उत्पन्नाचा मार्ग तयार होऊ शकतो. गेली काही वर्षे बेभरवशी हवामानामुळे आंबा व्यावसाय तोट्यात जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यापेशा काजूची लागवड सुमारे दुप्पट आहे.
या लागवडीतील केवळ काजू बी वरच प्रक्रिया केली जाते. त्याची बोंडे वापरली जात नाहीत. त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात आतापर्यंत अनेकदा बागायतदार प्रक्रियादारांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मंजुरीतील किचकट प्रक्रियेमुळे त्यात यश आले नाही. आता काजू बोर्डासाठी पाच वर्षासाठी १.३२५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उधोजकांना प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना कृषी विभागाने केल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर