चीनमध्ये सापडली १० लाख वर्ष जुनी मानवी कवटी, अनेक मोठे रहस्य उघड होणार

पुणे, ७ ऑक्टोंबर २०२२: हुबेई इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल रिलीक्स अँड आर्कोलॉजीचे संशोधक लू चेंगक्यु यांनी सांगितलं की, आता सापडलेली नवीन कवटी पूर्वीच्या दोन कवट्यांसारखीच आहे. असं मानलं जातं की या तीन कवट्या ज्या लोकांच्या आहेत ते एकाच काळातील असतील.

त्याच वेळी, प्राचीन स्थळाच्या उत्खननात सहभागी मुख्य पुरातत्वशास्त्रज्ञ जाओ शिंग यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की, एक दशलक्ष वर्षे जुने काही मानवी जीवाश्म जगात अस्तित्वात आहेत. ते पुढं म्हणाले की, युआनमोउ मॅन आणि लॅन्टियन मॅन सुमारे १.२ दशलक्ष वर्षांपूर्वी चीनसह संपूर्ण पूर्व आशियामध्ये होते. तर पेकिंग मॅन सुमारे आठ लाख वर्षांचा आहे.

नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कवटी बाहेर येईल

या ठिकाणी उत्खननाच्या कामात गुंतलेल्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाला आतापर्यंत मानवी कवटीचे हाडे आणि इतर काही भाग सापडले आहेत. संपूर्ण कवटी बाहेर काढण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. अहवालानुसार, नोव्हेंबर महिन्यापर्यंत या कामात गुंतलेली टीम कवटी पूर्णपणे बाहेर काढेल.

वास्तविक, या कवटीच्या माध्यमातून बरीच महत्त्वाची माहिती मिळू शकते, त्यामुळं पुरातत्वशास्त्रज्ञ कवटी बाहेर काढताना खूप काळजी घेत आहेत. या कवटीच्या माध्यमातून पूर्व आशियातील होमो इरेक्टसच्या इतिहासाविषयी अधिक जाणून घेण्यास मदत होईल, असा संशोधकांचा विश्वास आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने कवटी पूर्णपणे बाहेर काढल्यानंतर, त्याचे सर्व भाग व्यवस्थित तपासून संशोधन अभ्यास तयार केला जाईल. या अभ्यासामुळं संशोधकांना जुन्या पाषाण युगाच्या इतिहासाविषयी अधिक सखोल माहिती मिळण्यास मदत होईल.

लोखंडी शस्त्रं, प्राण्यांचे जीवाश्मही सापडले

त्याच वेळी, पुरातत्वशास्त्रज्ञांना साइटवरूनच काही प्रकारच्या प्राण्यांचे जीवाश्म सापडले आहेत. यातील काही प्राणी मांसाहारी तर काही शाकाहारी असावेत. यासोबतच उत्खननादरम्यान काही लोखंडी हत्यारंही टीमला सापडली आहेत. ही शस्त्रं शिकारीसाठी किंवा प्राण्याला खाण्यापूर्वी कापण्यासाठी वापरली गेली असावीत, असा विश्वास आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा