मणिपूर ३० मे २०२३ : मणिपूरमध्ये जातीय दंगलीत २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांनी आतापर्यंत २५ हल्लेखोरांना पकडले आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, दारुगोळा जप्त करुन त्यांना मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राज्यात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राष्ट्रपती राजवट तातडीने लागू करण्याची मागणी तेथील एका जमातीच्या गटाने केली आहे.
इम्फाळ खोऱ्यात आणि परिसरात गोळीबार आणि चकमकीच्या घटनांनंतर अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. इम्फाळ पूर्वीतील संसाबी, ग्वालताबी, शबुनखोल, खुनाओ येथे कारवाई दरम्यान लष्कराने २२ हल्लेखोरांना पकडले. त्यांच्याकडून शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले. १२ बोअरच्या पाच डबल बॅरल रायफल, तीन सिंगल बॅरल रायफल यासह अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी रात्री चार दिवसांच्या दौऱ्यावर मणिपूरला पोहोचले आहेत. तेथे ते वांशिक हिंसाचारावर तोडगा काढून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अधिकाऱ्यांशी बैठका घेणार आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते इंफळमधील बीर टकेंद्रजीत इंफळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर शहा यांचा पहिलाच राज्य दौरा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर