१०५ वाल्यांकडून स्वाभिमान गहाण ठेवण्याची भाषा: शिवसेना

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमानाची आठवण करून दिली होती. फडणवीस यांच्या स्वाभिमानाच्या मुद्याला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. स्वाभिमान गहाण वगैरे ठेवण्याची भाषा आता १०५ वाल्यांकडून होत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेनेनं भाजपाला स्वाभिमानावरूनच डिवचलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्या नुकसान भरपाईपोटी राज्यपालांनी मदत जाहीर केली. यावरून शिवसेनेनं भाजपाला स्वाभिमानाची आठवण करून दिली आहे.
शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीवरून भाजपावर टीका केली आहे. “देशाला स्वातंत्र्य मिळून आता सात दशकांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण अस्मानी आणि सुल्तानीच्या तडाख्यात सापडून सामान्य शेतकऱ्याची होणारी कोंडी आजही कायमच आहे. स्वतंत्र हिंदुस्थानातही वेगळे काहीच घडताना दिसत नाही. मग बदलले काय? या प्रश्नाचे कोणते उत्तर सध्याच्या राज्यकर्त्यांकडे आहे? राज्यात भाजपाचे राज्य जनतेने आणले नाही याचा सूड केंद्राने शेतकऱ्यांवर घेऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती करीत आहोत. स्वाभिमान गहाण वगैरे ठेवण्याची भाषा आता १०५ वाल्यांकडून होत आहे, पण ओल्या दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाठ वाकली असली तरी कणा मोडलेला नाही व या पाठकण्यांच्या आशीर्वादानेच आम्ही दिल्लीशी झगडा करीत आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेली मदत तुटपुंजी असल्याची विधाने चंद्रकांत पाटील वगैरेंनी केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण मग शेतकऱ्यास नक्की काय मिळाले? दिल्लीत व राजभवनात त्यांचेच राज्य आहे. तेव्हा या तुटपुंज्या मदतीचा निषेध म्हणून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा आवाज उठविण्याची हिंमत त्यांच्यात आहे काय, हे आधी त्यांनी सांगावे. सध्या १०५ वाल्यांचे बोलणे सावध व डोलणे बेसावध बनले आहे,” असा चिमटा शिवसेनेनं भाजपाला काढला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा