अकरावी प्रवेशाचा गोंधळ थांबेना, पालक-विद्यार्थ्यांची चिंता वाढली; “अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा?”

11th admission process delay in Maharashtra
पालक-विद्यार्थ्यांची चिंता वाढली;

11th admission process delay in Maharashtra: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यंदा दहावीचा निकाल दहा दिवस आधी जाहीर करून पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता की अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल. मात्र, सध्या सुरू असलेल्या गोंधळामुळे या आनंदावर विरजण पडले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींच्या गर्तेत सापडली असून, पहिली निवड यादी जाहीर होण्यास चार दिवसांचा विलंब होणार असून, आता ती सोमवारी (३० जून) जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तांत्रिक अडचणींचा ससेमिरा;
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयांचा कट-ऑफ दिसत नसल्याने गुणवत्ता यादी जाहीर होण्यास उशीर होत आहे. मागील अनुभवांवरून पालक आणि विद्यार्थी नवीन वेळापत्रकावर विश्वास ठेवायला कचरत आहेत. “अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? हा गोंधळ कधी थांबणार?” असे प्रश्न विचारले जात आहेत.

पालक आणि विद्यार्थ्यांची व्यथा;

पालक अपर्णा जाधव यांच्या मते, “अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे सर्व नियोजन कोलमडले आहे. कशीबशी सुट्टी मिळवून तीही वाया घालवायची म्हणजे काय? आम्हा पालकांनी काय करावे? किती दिवस वाट बघावी? आम्हाला पारदर्शक प्रवेश प्रक्रिया हवी आहे.” विद्यार्थी बिस्मिल्ला मुल्ला आपली चिंता व्यक्त करतात, “प्रवेश वेळेवर मिळाला नाही तर अभ्यास कसा सुरू होणार? यात वेळ वाया जात असल्याने चिंता वाढत आहे.”

शिक्षकांकडूनही नाराजी;

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे गुणवत्ता यादी जाहीर होण्यास विलंब होत आहे. परिणामी मुलांच्या सुट्ट्यांचा कालावधी लांबत आहे, हे करिअरच्या दृष्टीने धोकादायक आहे. शैक्षणिक कामकाजाचे दिवस कमी होणार असल्याने महाविद्यालयांचे वेळापत्रक बदलणार आहे.” यंदा दहावीचा निकाल लवकर लागूनही प्रवेश प्रक्रियेतील हा विलंब अनेकांना खटकत आहे. ‘तारीख पे तारीख’चा हा खेळ कधी थांबणार आणि विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश कधी मिळणार, हाच खरा प्रश्न आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे