विश्वचषक २०२३ मध्ये सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी द्या- आरपी सिंग

मुंबई, २९ जुलै २०२३ : श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत भारतात खेळल्या जाणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवच्या वापराचे माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग याने समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) या जागतिक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमारला या चौथ्या जागेवर पुरेशी संधी दिली पाहिजे.

२०१९ च्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर मजबूत फलंदाज नसल्याचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संघासाठी हा मुद्दा त्रासदायक ठरला आहे. सूर्यकुमार आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या टी-२० क्षमतेची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. आरपी सिंग यांनी मात्र सूर्यकुमारचा पर्याय नाकारणे मूर्खपणाचे ठरेल असे म्हटले आहे.

आरपी सिंग म्हणाले, श्रेयस अय्यर सोबत सूर्यकुमार यादव हा चौथ्या क्रमांकासाठी चांगला पर्याय आहे, त्याच्याकडे पर्याय म्हणून पाहत असाल तर येत्या सामन्यांमध्ये त्याचा वापर महत्त्वाचा ठरेल. तो नक्कीच एक चांगला पर्याय आहे. मात्र, सूर्यकुमारला अजून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवायचा आहे, पण तो ज्या प्रकारचा फलंदाज आहे, त्यामुळे तो चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर चांगला खेळू शकतो, असे आरपी सिंग यांनी जिओ सिनेमाने आयोजित केलेल्या संवादादरम्यान सांगितले.

आरपी सिंग म्हणाले, मोठ्या स्पर्धांपूर्वी तुमच्याकडे नेहमीच पर्याय असले पाहिजेत. टी-२० क्रिकेटमधला सुर्यकुमारचा सध्याचा फॉर्म खूप चांगला आहे. परंतु एकदिवसीय फॉर्मेट हा वेगळा आहे, कारण तुमच्याकडे जास्त चेंडू असतात. यामुळे फलंदाजांना सतत आपली योजना बदलावी लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा