धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने १९२६ हेक्टरवर नुकसान

धाराशिव ३ डिसेंबर २०२३ : धाराशिव जिल्ह्यात गेल्या ३ दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल १९२६ हेक्‍टरवर पिकाचे नुकसान झाले असून याच्यात फळ पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. वाशी तुळजापूर परंडा कळंब आणि धाराशिव या पाच तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याची माहिती धाराशिवचे कृषी अधिक्षक अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे. ही आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची असून याच्यात देखील वाढ होण्याची शक्यता माने यांनी व्यक्त केली आहे.

शेतकर्‍यांनी शेतात काढून टाकलेला कांदा अचानक झालेल्या पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागा, टोमॅटो, भाजीपाला व इतर बागा व फळभाज्यांसाठी हा पाऊस घातक ठरला. तसेच फुलोर्‍यात आणि शेंगा वाळण्याच्या स्थितीत असलेल्या तूर पिकालाही या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. पावसानंतर कृषी विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या नुकसानीची माहिती गोळा करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना शेतशिवाराला आगामी काळात दिलासा मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा