सेमिकंडक्टर क्षेत्रामध्ये आर्यन्स ग्रुप च्या माध्यमातून भारत होणार आत्मनिर्भर

पुणे, ४ नोव्हेंबर २०२३: सेमीकंडक्टर उद्योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे धोरणात्मक महत्त्व देखील वाढले आहे. सेमीकंडक्टर शिवाय कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चालवणे अशक्य आहे. कोरोना काळात सेमीकंडक्टर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अनेक उद्योगांना मोठा फटका बसला होता. यामध्ये सर्वात चिंतेची बाब म्हणजे भारत सेमीकंडक्टरसाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे हा उद्योग लवकरात लवकर भारतात येणे खूप गरजेचे बनले आहे. यासाठी भारत सरकार देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतील मायक्रोन कंपनीसोबत झालेली भारत सरकारची डील.

ही कंपनी भारतात यावी म्हणून भारत सरकारने सवलतीच्या स्वरूपात या डील मधील जवळपास ७५ टक्के रक्कम दिली आहे. तर मायक्रोन कंपनी केवळ २५ टक्केच रक्कम यात गुंतवणूक करणार आहे. मात्र मालकत्व पूर्णपणे मायक्रोन कंपनीकडे असणार आहे. यावरूनच लक्षात येते की भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र किती महत्त्वाचे आहे.

यापूर्वी वेदांता फॉक्सकॉन या दोन कंपन्यांमध्ये करार झाला होता. या करारानुसार भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणार होते. मात्र हा करार देखील अपयशी झाला. सेमीकंडक्टर उत्पादनाचे तंत्रज्ञान अतिशय जटील असल्यामुळे तसेच देशाबाहेरील कंपन्या हे तंत्रज्ञान भारतात आणण्याविषयी खूप संवेदनशील असल्याने भारतात हा उद्योग आणणे खूप कठीण आहे. अलीकडे भारतात अनेक कंपन्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रात काम करणार असल्याची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसून आली नाही.

सेमीकंडक्टर उद्योग तांत्रिकदृष्ट्या अतिशय जटील आहे. यामुळेच हा उद्योग आत्तापर्यंत भारतात आलेला नाही. यासाठी सरकारकडून देखील खूप प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् देखील हा उद्योग भारतात स्थापन करण्यासाठी तयार आहे. याची सुरुवात कंपनी OSAT (outsourcing semiconductor assembly and testing) ने करत आहे. यासाठी कंपनी तीन टप्प्यांमध्ये काम करत आहे.

सध्या ४ नॅनोमीटर टेक्नॉलॉजी वर आधारित मायक्रो चिप्स उपलब्ध आहेत. परंतु दिवसेंदिवस कमी जागेत जास्तीत जास्त ट्रांजिस्टर बसवणे आव्हानात्मक असणार आहे आणि तेवढे खर्चिक देखील असणार आहे. त्यामुळे पुढील भविष्य हे पॅकेजिंग आणि असेंबली चे असणार आहे. मेमरी चीप, प्रोसेसर, अॅनलॉग चिप्स आणि इतर कंपोनेंट कमीत कमी जागेवर कसे बसवता येतील हे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे OSAT (outsourcing semiconductor assembly and testing) ची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

कंपनी या क्षेत्राशी संबंधित 2.5D आणि 3D पॅकेजिंग टेक्नॉलॉजी भारतात आणणार आहे. या प्रकल्पावर कंपनीने या आधीच काम सुरू केले आहे. तसेच काही देशांतील कंपन्यांसोबत देखील कंपनीची बोलणी सुरू आहे. सध्या याबाबत कंपनीने फारशी माहिती सार्वजनिक केलेली नाही. मात्र पुढील काही महिन्यात कंपनी महाराष्ट्रात सुसज्ज फॅसिलिटीज चे बांधकाम सुरू करेल.

याबरोबरच आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् भारतात OLED डिस्प्ले फॅब सेटअप करत आहे. यासाठी कंपनीने साऊथ कोरिया मधील CLAP कंपनी सोबत करार केला आहे. भारतात बनवले जाणारे हे डिस्प्ले लो पॉवर कंजूम करणारे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डिस्प्ले पॅनल्स फोल्डेबल असतील. तसेच पेपर थीम टेक्नॉलॉजी वर आधारित असल्यामुळे याचा विव्हींग एक्सपिरीयन्स हा इतर डिस्प्ले टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चांगला असणार आहे. कंपनी भारतात ट्रान्सपरंट डिस्प्ले देखील बनवणार आहे. याबरोबरच कंपनी Micro LEDs डिस्प्ले मोड्युल, ऑरगॅनिक TFT, वेगवेगळे मायक्रोसेंसर देखील बनवणार आहे.

एकंदरीत, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् भारतात जी टेक्नॉलॉजी आणत आहे, ती भारतातील मार्केट साठी गेम चेंजिंग ठरणार आहे. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील.

न्युज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा