मोरबी दुर्घटनेत भाजप खासदार मोहनभाई कुंदारिया यांच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

गुजरात, ३१ ऑक्टोबर २०२२: गुजरात येथील मोरबीमध्ये मच्छू नदीवर बांधण्यात आलेला झुलता पूल कोसळल्यानं आतापर्यंत जवळपास १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत गुजरातमधील खासदार मोहन कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही मृत्यू झाला आहे. स्वतः मोहन कुंदरिया यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, या दुर्घटनेत पाच मुलांसह एकूण १२ नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. यात माझ्या बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना योग्य शिक्षा करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

भूपेंद्र पटेल यांचे ट्विट :

मोरबीच्या या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मोरबी येथील झुलत्या पुलाच्या दुर्घटनेने खूप दुःख झाले आहे. यंत्रणेकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

मोरबी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना गुजरात राज्य सरकारने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. राज्य सरकार प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य अजूनही सुरू असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा