पेन्शनसाठी १२० वर्षांच्या आईला खाटेवरून नेले बँकेत

ओडिशा, दि.१५ जून २०२०: ग्रामीण भागात नसलेल्या ग्राहकाभिमुख सेवा, सुविधांमुळे नागरिकांना किती अडचणींना सामोर जावे लागते याचे जिवंत उदाहरण नुकतेच माध्यमांसमोर आले आहे. या घटनेमुळे आपल्या व्यवस्थेवर एक प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे . एका ज्येष्ठ महिलेला बँकेच्या सूचनेनुसार आपल्या १२० वर्षांच्या आईच्या पेन्शनसाठी खाटेवर टाकून बँकेत घेऊन जावे लागले. गुरुवारी ही घटना ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील खरिअर ब्लॉकमधील बारगन गावात घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बँकेतील आपल्या पेन्शन अकाऊंटमधून १,५०० रुपये काढण्यासाठी १२० वर्षांच्या वृद्ध महिलेने आपली ७० वर्षीय मुलगी गुंज देई यांना बँकेत पाठवले. गुंज देई ज्यावेळी बँकेत पोहोचल्या तेव्हा त्यांना पेन्शनची रक्कम देण्यास बँक अधिकाऱ्यांनी नकार दिला. तसेच बँकेत खातेधारक महिलेला प्रत्यक्ष हजर करण्यास सांगितले. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.

गुंज देई या देखील स्वतः ज्येष्ठ नागरिक असून १२० वर्षे वय असलेल्या त्यांच्या आईला चालता येत नाही आणि त्या अंथरुणाला खिळून असल्यामुळे आपल्या आईला एका खाटेवर टाकून ओढत बँकेत नेण्याशिवाय गुंज देई यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. गुंज देई जेव्हा आपल्या आईला खाटेवरुन घेऊन बँकेत पोहोचल्या तेव्हा त्या दोघींचे वय आणि अवस्था पाहून बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तातडीने पेन्शनची रक्कम काढून दिली.

दरम्यान, सोशल मीडियात गुंज देई यांनी आपल्या आईला खाटेवरुन ओढत बँकेत नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. स्थानिक प्रशासनाला देखील या घटनेची दखल घेणे भाग पडले. सर्व प्रकारच्या बँकांच्या मॅनेजर्सना प्रशासनाने लिखित आदेश दिले की, बँकांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा पुरवण्यात यावी.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा