अमेरिकेतून १,२५,००० रेमेडिसीव्हीर, जर्मनीकडून ४ ऑक्सिजन कंटेनर दिल्लीत दाखल

नवी दिल्ली, ३ मे २०२१: कोरोना साथीमुळं देशात प्रचंड मृत्यू होत आहे. कोरोनाची वाढती प्रकरणं आणि ऑक्सिजन व इतर आरोग्य सामग्रीचा अभाव यामुळं हे संकट अधिकच तीव्र होत आहे. भारतातील कोरोनाच्या नवीन प्रकरणांनी चार लाखांचा टप्पा ओलांडलाय. अशा परिस्थितीत परदेशी देशांकडून भारतात मदत पाठविली जात आहे.

या अंतर्गत अमेरिकेनं पाठवलेल्या रेमेडिसीव्हीरच्या १,२५,००० इंजेक्शन्स सोमवारी दिल्ली विमानतळावर पोहोचल्या. या पुरवठ्यामुळं रेमेडिसीव्हीरची कमतरता दूर करण्यासाठी काही मदत होईल. दुसरीकडं, कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायु दलानं ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.

त्याच वेळी भारतीय हवाई दलाच्या सी -१७ विमानानं जर्मनीकडून हिंडॉन एअरबेसवर ४ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर विमानात आणले. या व्यतिरिक्त ४५० ऑक्सिजन सिलिंडरसुद्धा यूकेमधून विमानात आणून चेन्नईच्या एअरबेसमध्ये नेण्यात आले. भारतीय हवाई दलानं याबाबत माहिती दिली.

विदेशातून ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या जहाजं स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. आखाती देश आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या जवळ असलेल्या अवजड क्षमतेच्या जहाजांना अशा मोहिमेसाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. नौदलाच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

दुसरीकडं भारत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ४ मे रोजी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्हर्च्युअल समिट होणार आहे. शिखर परिषद होण्यापूर्वी ब्रिटननं आणखी १००० व्हेंटिलेटर भारतात पाठविण्याचा निर्णय घेतलाय. यामुळं रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर कोरोना रुग्णांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. मागील आठवड्याच्या सुरुवातीस, यूकेनं २०० व्हेंटिलेटर, ४९५ ऑक्सिजन कंसनट्रेटर्स आणि तीन ऑक्सिजन जेनेरेशन यूनिट देण्याची घोषणा देखील केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा