ग्रामीण पोलिस दलाच्या ताफ्यात १४ नवीन वाहने दाखल; पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर, ५ मार्च २०२३ : जिल्हा नियोजन विकास निधीतून ग्रामीण पोलिस दलाच्या ताफ्यात १४ नव्याकोऱ्या वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. यामध्ये ७ फोर्स मोटर्स ट्रॅक्स, ७ महिंद्रा बोलेरो निओ अशा १४ वाहनांचा समावेश झाला आहे. ही सर्व वाहने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमांतून २ कोटी २० लाख ३२ हजार रुपये या निधीच्या माध्यमातून घेण्यात आली आहेत.
या सर्व वाहनांचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. ४ मार्च) ग्रामीण पोलिसांच्या कवायत मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री यांनी यापुढेही जिल्हा पोलिस दलास मागणीप्रमाणे वाहने उपलब्ध करून देण्यात येतील; तसेच त्यांना अत्यावश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा ज्यात प्रशिक्षण हॉल, बाहेरगावाहून कामानिमित्त येणारे अधिकारी, अंमलदार यांना राहण्यासाठी व्यवस्था, पोलिस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम, नागरी सुविधा आदींचे आश्वासन दिले.

यावेळी के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना (विशेष पोलिस महानिरीक्षक), आस्तिककुमार पांडये (जिल्हाधिकारी), मनीष कलवानिया (पोलिस अधीक्षक), महक स्वामी (सहा. पोलिस अधीक्षक), वैजापूर उपविभागीय अधिकारी महेंद्र महोड, पोलिस निरीक्षक, मोटर परिवहन विभाग, सर्व प्रभारी अधिकारी, पोलिस अंमलदार यांची उपस्थिती होती. डॉ. विशाल नेहूल (उपविभागीय पोलिस अधिकारी, पैठण) यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा