मुंबई, २६ नोव्हेंबर २०२२ : २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज १४ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ नागरिकांना जीव गमवावा लागला होता.
कसाब आणि त्याच्या साथीदारांनी पाकिस्तानातून भारतात समुद्रमार्गे प्रवेश केला. कफ परेड येथील बधवार पार्क येथून हे दहशतवादी मुंबईत घुसले. या हल्ल्यानंतर दुर्लक्षित असलेल्या सागरी सुरक्षेवर सर्वांचे लक्ष गेले. तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आले.
या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून विनम्र अभिवादन केले जात आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह तसेच हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गेटवे ऑफ इंडिया येथील पोलीस स्मारकावर पुष्पहार अर्पण केला आणि श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकावर वाहिली श्रद्धांजली
वाद पेटणार : राज्यपालांनी चप्पल घालूनच वाहिली शहिदांना श्रद्धांजली
अशातच आता एक व्हिडिओ सोशलवर मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चप्पल घालून शहिदांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले. चप्पल घालून अभिवादन केल्यामुळे ते पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या या नव्या कृतीवर संताप व्यक्त केला जात असून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांचा चप्पल घालून श्रद्धांजली वाहात असतानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे हाच व्हिडिओ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र या राज्यपालांच्या ट्विटर हँडलवरही अपलोड करण्यात आला आहे. त्यातही राज्यपाल पायात चप्पल घालूनच शहिदांना पुष्पगुच्छ अर्पण करताना दिसत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.